पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात फलक लावण्यास परवानगी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षांत नवीन जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच या विभागाला १७ कोटी २४ लाखांची वसुली करण्यात यश आले आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत शहरातील विविध भागांत जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी दिली जाते. गेल्यावर्षी परवानगी दिली नव्हती. यावर्षी शासन निर्णयानुसार नवीन जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. सध्या शहरात दोन हजार १०४ अधिकृत जाहिरात फलक अधिकृत आहेत. परवानाधारक फलकांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होत आहे. आकाशचिन्ह विभागाच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत घसघशीत वाढ झाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आकाशचिन्ह विभागाला १७ कोटी २४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शहराच्या सौदर्यांत बाधा न येता जाहिरात फलक उभारणे आणि उत्पन्न वाढीसाठी आकाशचिन्ह विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षांत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

बीआरटी रस्ते, मेट्रो पिलर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते दुभाजकांमध्ये किऑस्क उभारणे, महापालिकेच्या ५० जागेवर सांगाडे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

शहरातील ४३३ जाहिरात फलकांचे वाद

शहराच्या विविध भागातील ४३३ जाहिरात फलकांचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. संबंधितांकडे सुमारे नऊ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल झाली असती, तर उत्पन्नात मोठी वाढ झाली असते.

आकाशचिन्ह व परवाना विभागात उत्पन्न वाढीसाठी जुनी थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य दिले. शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण केले. काही जाहिरात फलकांची पालिकेकडे नोंद नव्हती. त्याची नोंद करून वसुली केली. आता नवीन जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. -सचिन ढोले उपायुक्त,आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका