डोंबिवली : वायू आणि जल या दोन्ही प्रकारच्य प्रदूषणाबद्दल नेहमीच चर्चेत राहिलेल्या कल्याण व डोंबिवली या शहरांतील वाढत्या प्रदूषणाचा फटका आता पाळीव प्राण्यांना विशेषत: श्वानांना बसू लागला आहे. या शहरांतील प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असतानाच, गेल्या महिनाभरापासून वाढलेले तापमान आणि प्रदूषण यांमुळे आजारी पडणाऱ्या श्वानांच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या महिन्यात अशाप्रकारे १७ श्वान आजारी पडल्याची नोंद असून त्यापैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
‘वेटरनरी प्रॅक्टिश्नर वेलफेअर असोसिएशन’ या संस्थेने कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आजारी पडलेल्या श्वानांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात जास्त असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी मार्च ते मे महिन्यात कल्याण, डोंबिवलीत आजारी पडलेल्या ३५ श्वानांची नोंदणी संस्थेकडे झाली होती. या वर्षी मात्र मार्च महिन्यातच शरीरातील पाणी कमी झाल्याने १७ श्वान आजारी पडले असून २ श्वानांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात श्वानांच्या आजाराचे प्रमाण वाढत असून पुढील काही महिन्यांत हा आकडा वाढण्याची भीती पशुवैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘श्वासोच्छवासास त्रास होणे, उलटय़ा होणे, ओठ पांढरे होणे, जीभ लाल होणे, तोंडातून घट्ट लाळ बाहेर पडणे, हृदयाचे ठोके वाढणे, फीट किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणे श्वानांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. सर्वच शहरांमधील तापमान वाढत असल्याचा फटका श्वानांना बसत आहे. परंतु डोंबिवलीतील वायुप्रदूषणाचा प्रतिकूल परिणामही श्वानांच्या तब्येतीवर दिसू लागला आहे.
डॉ. मनोहर अकोले, अध्यक्ष, ‘वेटरनरी प्रॅक्टिश्नर वेलफेअर असोसिएशन’