पुणे – पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणाहून या निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी शुक्रवारी काढले आहे. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर झाले असून, ते लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एकूण १४ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यांचा आहे समावेश
यात यशवंत नामदेव गवारी (कोल्हापूर), राजेंद्र जयंत निकाळजे (मुंबई शहर), भानुदास आण्णासाहेब जाधव (मुंबई शहर), दिलीप तुकाराम भोसले (मुंबई शहर), सुनील रंभाजी दहिफळे (मुंबई शहर), संजय वामनराव निकम (पुणे शहर), पांडुरंग बाबासाहेब गोफणे (रायगड), सतीश विठ्ठल पवार (कोल्हापूर), सुनील विष्णू पवार (अहमदनगर), सुधाकर पंडीतराव काटे (सीआयडी), श्रीराम बळीराम पौड (राज्य गुप्तवार्ता विभाग), अजय विनायकराव जोगदंड (पोप्रकें नानवीज, दौंड), टी. वाय. मुजावर (सीआयडी) आणि प्रदीप उत्तम लोंढे (मुंबई शहर) यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा १ मे चा मुहूर्त हुकल्यानंतर आता १५ ऑगस्टला आयुक्तालय सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. त्याबाबत अधिकृत आदेश काढण्यात आले नसून शुक्रवारी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून २ हजार २०७ पदे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे ३ टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६० टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुसऱ्या टप्प्यात २० टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिसऱ्या टप्प्यात २० टक्के पदे भरली जाणार आहेत.