मालाडमध्ये भिंत कोसळली; 18 जण ठार !

0

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान झाले असून बचावकार्य सुरु आहे.

दुर्घटनेत जखमी झालेल्या 15 जणांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी दोघांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर 52 जणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय अंधेरीच्या कूपर रुग्णालयात 2 जणांना दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यामध्ये बांधकाम मजूर असलेल्या एका महिलेसह बालकाचा समावेश आहे. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवीन बांधकाम सुरू आहे. भिंतीच्याकडेला या बांधकामावरील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते.