मुंबई : राज्यातील जनतेने “मन की बात” ऐकताना “वन की बात” केली त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले. भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच या उपक्रमाची माहिती देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार मंगल प्रभात लोढा, वन सचिव विकास खारगे यांच्यासह राज्यभरातील वनाधिकारी आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये स्वामीनारायण संस्था, पतंजली योग समिती, ईशा फाऊंडेशन, पतंजली आयुर्वेद कंपनी लि, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, अनिरुद्ध अकादमी ऑफ डिसॅस्टर मॅनेजमेंट, जीवनविद्या मिशन (सद्गुरु वामनराव पै), तुलसी भवन बालमित्र मंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्र सरकारने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने भारतातील वनांचा अभ्यास करून अहवाल जाहीर केला ज्यामध्ये चार क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिले आले. यामध्ये वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनाशिवाय वनक्षेत्रात वॉटर बॉडिज निर्माण करणे,बांबू लागवड आणि कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यांचा समावेश आहे. वन आहे तर जल आहे आणि जल आहे तर जीवन हे लक्षात घेऊन काम करणारा आपला चिंतनशील समाज आहे. दोन वर्षातील लोकसहभागाने राज्याला हे यश मिळवून दिले आहे.
बैठकीत आमदार मंगल प्रभात लोढा यांनी चंद्रपूर आणि बल्लारशहा ही रेल्वे स्थानके देशातील सर्वात सुंदर रेल्वेस्थानके निवडल्या गेल्याबद्दल वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. बैठकीत विविध धार्मिक आणि अध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होऊन ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. त्यांना शासनाकडून असलेल्या अपेक्षित सहकार्याबाबतही त्यांनी आपली मतं मांडली.
यावेळी राज्यातील वृक्ष लागवड, राज्याचे वृक्षाच्छादन आणि ग्रीन आर्मी ची माहिती देणारे सादरीकरण वन विभागामार्फत करण्यात आले. वन विभाग सचिव विकास खारगे यांनी वन विभागाच्या या मिशनची माहिती देताना प्रकृती ईश्वर स्वरूप असून तिच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून सर्वांनी पुढे यावे असे म्हटले. 28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघरची पोटनिवडणूक होणार आहे.