शिंदखेडा(प्रतिनिधी): डीजेसह इतर वाद्ये नियमानुसारच वाजविली जावे, तसेच असे वाद्य वेळेतच बंद होऊन ध्वनिप्रदूषण कमी करावे, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पोलिस निरीक्षक सुनील बाभड यांना निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा शिंदखेडा शहरासह परिसरात सध्या लग्नसराई व विविध सण व उत्सवात डीजेसह विविध वाद्ये वाजविली जातात. त्यांचा आवाज प्रमाणापेक्षा जास्त असल्याने ती लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असून, या आवाजामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही वाद्ये ६५ डिसिबलच्या वरती वाजविली जातात. परवानगी न घेताच या वाद्यांच्या कर्कश आवाजाचा वापर केला जातो. तसेच रात्री दहापर्यंत परवानगी असूनदेखील वाद्ये रात्री बारापर्यंत वाजविली जातात. याबाबत योग्य ती कारवाई करून वाद्ये नियमानुसारच वाजविली जावीत.
निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव भामरे,सचिव डी. के. पाटील, अशोक राखेजा, ज्ञानेश्वर पाटील, भगवान ढोले, भास्करराव पवार, संतोष बडगुजर, गुलाबराव पाटील, डॉ. पी. एन. पाटील, आर. बी. पाटील, सुरेश पवार आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीने ज्येष्ठ अवाक्–
■ शुक्रवारी येथील ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा होती. सभेत आयत्या वेळच्या विषयात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव भामरे यांनी डीजेच्या कर्कश आवाजाबाबत विषय घेतला व याबाबत सर्वांनी एकमताने ठराव करून या त्रासदायक ध्वनिप्रदूषणाचा बंदोबस्त व्हावा म्हणून शिंदखेडा पोलिस निरीक्षकांना निवेदन द्यायचे ठरविले. याबाबत पोलिस निरीक्षकांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. पोलिस निरीक्षक सुनील बाभड यांनी ज्येष्ठांचा आदर राखत ज्येष्ठ नागरिक संघातच याबाबतचे निवेदन घेण्यासाठी गेले. या वेळी त्यांनी ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलिस निरीक्षक ज्येष्ठांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आल्याने सर्वांनी त्यांचे कौतुक केले.