महापौर, स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत केली कार्यवाही
जळगाव – शहरात मनपाने काही भूखंड अनेक वर्ष होऊनही विकसित करण्यात आले नसल्याची बाब मनपाच्या निर्देशनास आले होते. संबंधित जागा मालकांना मनपाने त्या जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शनिवारी रेडक्रॉस सोसायटीच्या मागील बाजूला असलेला 15 हजार चौरस फुटाचा भूखंड मनपाने ताब्यात घेतला. महापौर सिमा भोळे व स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतुलसिंह हाडा, मनोज (पिंटू) काळे, मनपा मिळकत व्यवस्थापक राजेंद्र पाटील, नगररचना विभागाचे सुहास चौधरी, शकील शेख, शाखा अभियंता प्रसाद पुराणीक आदी उपस्थित होते.
मनपा च्या उत्पन्नात वाढ होणार
नवीन बी.जे.मार्केटच्या शेजारी रेडक्रॉस सोसायटीच्या मागील बाजूला असलेला भूखंड क्रमांक 167 ब हा 15 हजार 200 चौ.फुटाचा भूखंड क्रमांक तत्कालीन न.पा.ने आठवडे बाजारासाठी खरेदी केला होता. परंतु तत्कालीन न.पा.ने हा भूखंड नर्सिंग असोसिएशनला 99 वर्षाच्या कराराने दिला होता. अशी कोणतीही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली नसल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर 81 ब ची कारवाई करून शनिवारी मनपा प्रशासनाने ती जागा ताब्यात घेतली. यामुळे मनपाचे होणारे मोठे आर्थिक नुकसान वाचले असून भविष्यात मनपा च्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
अॅड.शुचिता हाडांच्या प्रयत्नांना यश
स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी 20 जून 2019 रोजी या जागेबाबत मनपा प्रशासनाकडे पत्र दिले होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सदर जागा मनपाच्या मालकीची असल्याचे निर्देशनास आले होते. शनिवारी मनपा प्रशासनाने ती जागा ताब्यात घेतल्याने अॅड.शुचिता हाडा यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.