मोदींनी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या असत्या

0

राहुल गांधी यांचा काँग्रेसच्या जनआक्रोश सभेत आरोप

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने देशात फक्त द्वेष पसरवला. मोदींच्या ना शब्दात वजन आहे ना त्यांच्या भाषणात पारदर्शकता. ते जिथे जातात तिथे फक्त भाषणे करतात. समाजातील प्रत्येक घटकांची त्यांच्यावर नजर आहे. त्यांनी देशातील कोट्यवधी लोकांची निराशा केली आहे. जिथे संधी मिळेल तिथे भाषण करणारे आमचे पंतप्रधान भ्रष्टाचार, महिला, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारीवर बोलतच नाहीत. काँग्रेस देशातील शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला नसता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जमिनी लाटल्या असत्या, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. ते नवी दिल्लीत काँग्रेसच्या जनआक्रोश सभेत बोलत होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांची पक्षाच्या वतीने ही पहिलीच मोठी सभा होती. अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली.

2019मध्ये काँग्रेसचाच विजय
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा कार्यकर्ता शेर का बच्चा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर सत्यसाठी आपला जीव दिला आहे. काँग्रेस पक्षात सर्वांचा आदर केला जातो आणि केली जाईल. जे कार्यकर्त्यांचा आदर करणार नाहीत त्यांच्यावर मी कारवाई करेन. हा पक्ष संपूर्ण देशाचा आहे. भाजपामध्ये फक्त मोदी आणि अमित शाह यांनाच आदर दिला जातो. तिथे कार्यकर्त्यांची कदर केली जात नाही. तसेच यावर्षी जिथे जिथे निवडणुका होतील तिथे काँग्रेस सत्तेवर येईल. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये आणि 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचा विजय होईल, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचार्‍यांमध्ये बसून भ्रष्टाचारावर भाषण
देशातील जनता या सरकारवर नाराज आहे. समाजातील प्रत्येक घटकाची सरकारवर नजर आहे. भ्रष्टाचारावर आपल्या भाषणात जोर देणारे मोदी जेव्हा कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारासाठी उभे राहतात. तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला येदियुरप्पा बसलेले असतात. येदियुरप्पा भ्रष्टाचाराप्रकरणी तुरूंगात जाऊन आले आहेत. तर त्यांच्या डाव्या बाजूला रेड्डी बंधू बसलेले असतात. या दोघांच्या मध्ये उभे राहून मोदी भ्रष्टाचारावर भाषणे देतात. देशाचा चौकीदार त्यावेळी काय करतो. मोदी म्हणतात, 70 वर्षांत देशात काहीच झाले नाही. मला 60 महिने द्या, मी भारताला बदलून टाकतो. मोदींनी 60 महिन्यांत बेरोजगारी दिली, भाजपाच्या आमदारांनी महिलांवर अत्याचार केला, छोट्या दुकानदारांना संपवले. चीनसमोर तर ते उभेही राहू शकले नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर ताशेरे ओढले.

नोटाबंदी आणि टॅक्सने कंबरडे मोडले
राहुल गांधी म्हणाले, मोदींनी जगभरात काँग्रेसबाबत खोटी माहिती पसरवली. आता सत्य बाहेर येत आहे. आता जनताच मोदींना सत्य दाखवेल. संघ आणि भाजपाने देशात द्वेष पसरवला. पण देशाला पुढे न्यायचे असेल तर प्रेमाची गरज आहे. तिरस्काराची नाही. देशातील प्रत्येक संस्थेवर संघाचा माणूस नेमला जात आहे. प्रत्येक मंत्र्याकडे संघाचा ओएसडी आहे. सगळीकडे संघाची माणसे पेरली आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या शब्दांत वजन असेल असे वाटले होते. चार वर्षांत रोजगार सोडा बेरोजगारी वाढली आहे. नोटाबंदी आणि गब्बरसिंह टॅक्समुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांना भेटलो तर त्यांनी एक चकारही यावर काढला नाही. आपले पंतप्रधान चीनमध्ये जाऊन जिनपिंग यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेतात. कोणत्याही अजेंड्याशिवाय त्यांच्यात चर्चा सुरू असते. हे कसे शक्य आहे. तिकडे डोकलाममध्ये चीनचे सैन्य आहे. त्यांनी हेलिपॅड उभारला आहे.

लोकशाही धोक्यात : डॉ. मनमोहन सिंग
डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, सध्याच्या सरकारच्या काळात संवैधानिक संस्था धोक्यात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. आपण काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांच्या अभियानाला पाठिंबा देत लोकशाही मजबूत केली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही ही संविधानाने दिलेली भेट असून त्याच्या संरक्षणासाठी आपण एकत्रित काम करायला हवे. मोदी सरकारने निवडणुकीच्या वेळी दिेलेली आश्‍वासने पाळली नाहीत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी झालेले असताना देखील सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नसून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.