जपानमधील भारतीय नागरिकांनी प्रगती करावी व भारताच्या प्रगतीस हातभार लावावा-मोदी

0

टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. भारत सध्या अनेक मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे. सध्या गुंतवणूक करायची असेल तर भारत हा एक उत्तम देश आहे. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय माणसांनी प्रगती करावी आणि भारताच्या प्रगतीलाही हातभार लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वैश्विक शांततेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सध्याच्या घडीला भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी, न्यू इंडिया ही भारताच्या विकासाची पावले आहेत. न्यू इंडिया घडवायचा असेल तर मला तुम्हा सगळ्यांचे सहकार्य हवे आहे असे आवाहन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान येथील भारतीय नागरिकांना केले. एवढंच नाही तर जगातली सर्वात मोठी शिल्पकृती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी तुम्ही जरूर भारतात या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिभा जेवढी महान होती तेवढेच महान शिल्प आम्ही साकारले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी भारतीय वैज्ञानिकांनी १०० सॅटेलाइट अंतराळात सोडले. आपण चांद्रयान आणि मंगळयानही इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी खर्चात पाठवलं आहे. भारतीय वैज्ञानिक आता गगनयान अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहेत. मेक इन इंडिया हा एक वैश्विक ब्रांड म्हणून उदयास येतो आहे. भारत दर्जेदार उत्पादनं तयार करतो आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल उत्पादनांच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.