चेन्नई-केंद्रातील सत्ता आणि २० हून अधिक राज्यांमध्ये यश मिळवणाऱ्या भाजपाचा विजय रथ दक्षिण भारताकडे कूच करत आहे. यातील सर्वांत पहिला टप्पा कर्नाटक असून येथे येत्या १२ मे रोजी मतदान होत आहे. त्यानंतर तामिळनाडूंचा क्रमांक लागणार आहे. भाजपाला तामिळनाडुत अद्याप आपले पाय रोवता आलेले नाही. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता तामिळनाडूत भाजपची सत्ता येण्याची आशा आहे.
नुकताच राजकारणात आलेले रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रितपणे तामिळनाडुत सरकार बनवू शकते असा दावा संघाचे विचारक गुरूमुर्ती यांनी केला आहे.
गुरूमुर्ती यांच्या मते रजनीकांत यांचे प्रचंड चाहते आहेत आणि ते तामिळनाडुचे राजकारण मजबूत करू शकतात. रजनीकांत यांच्या अपिलाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय कुशलतेच्या जोरावर विजयाची नोंद होऊ शकते. जनता विश्वास ठेऊ शकेल असा नव्या चेहरा तामिळनाडुच्या मुख्यमंत्रिपदी हवा असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडुतील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रजनीकांत नेहमी मोदींचे कौतुक करताना दिसतात. ते मोदी समर्थक असल्याचे मानले जाते. राजकारणात येण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे भाजपाला दक्षिण भारतात आशेचा किरण दिसत आहे.