शांतता, समृद्धी आणण्यासाठी एकत्र येऊ!

0

औपचारिक चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे चीनला आवाहन
राजशिष्टाचार तोडून मोदींचे चीनमध्ये उत्साहात स्वागत

वुहान : आपसी शांतता, स्थिरता आणी समृद्धी आणण्यासाठी भारत व चीनने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वुहान येथे केले. चीनसोबतच्या औपचारिक शिखर परिषदेसाठी गेलेल्या मोदींचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राजशिष्टाचार ओलांडून स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने मोदींसह भारतवासीय भारावून गेल्याचे दिसून आले. आपसी सलोखा व विश्वाच्या कल्याणासाठी काम करण्याकरिता भारत व चीनने एकत्र यावे. 2019 मध्ये भारत अशाप्रकारे औपचारिक शिखर परिषदेचे आयोजन करेल तेव्हा शी जिनपिंग यांनीही या परिषदेला आवर्जुन यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही यावेळी मोदी यांनी जिनपिंग यांना दिले. यावेळी मोदींनी भारत व चीनच्या परंपरागत संबंधांची आठवणही करून दिली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दोनवेळा राजधानी बाहेर येऊन मोदींचे स्वागत केले. अशाप्रकारे स्वागत होण्याची ही भारताची दुसरीच वेळ आहे. यापूर्वी स्व. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना अशाप्रकारचे स्वागत चीनने केले होते.

द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दोन दिवशीय दौर्‍यावर गेले आहेत. वुहान येथे त्यांचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जोरदार स्वागत केले. सोबत भोजन व प्रतिनिधी मंडळाशी चर्चेनंतर हे दोन्ही नेते औपचारिक शिखर परिषदेत सहभागी झाले. या परिषदेत मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. जगाची 40 टक्के लोकसंख्या आपल्या दोन देशांत राहते. भारत व चीन या दोन शक्ती एकत्र आल्या तर जगाचे भले होऊ शकते. पुढील वर्षासाठी अशाच औपचारिक शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांना आमंत्रित करताना विशेष आनंद होत आहे, असेही मोदींनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट केले, की शुक्रवारी सकाळी जिनपिंग यांनी हुबेई के म्युझियममध्ये मोदींचे भव्य स्वागत केले. द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्यावरदेखील या दोन्ही नेत्यांची चर्चेत भर दिला. भारतातील बॉलीवूड, योग, व भारतीय संस्कृती यांचा चीनवर मोठा प्रभाव असल्याची बाब यावेळी जिनपिंग यांनी मोदींशी चर्चेत मान्य केली.

तुमचे ‘न्यू एरा’, माझे ‘न्यू इंडिया’!
गतवर्षी तब्बल 73 दिवस चाललेल्या डोकलाम वादावरून भारत व चीनचे संबंध तुटेपर्यंत ताणले होते. त्यानंतर सीमेवर अद्यापही तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशातील हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न मोदींच्या या दोन दिवशीय चीनभेटीने झाला आहे. भारत व चीन या दोन देशांमध्ये दोन हजार वर्षांपासून असलेल्या सलोख्याच्या संबंधांना मोदींनी यावेळी उजाळा दिला. भारत व चीनने एकत्र येत जागतिक अर्थव्यवस्थेवर तब्बल 1600 वर्षे आपला दबदबा कायम ठेवला होता, याची आठवणही मोदींनी याभेटीत चीनला करून दिली. जागतिक अर्थव्यवस्थेचा 50 टक्के वाटा आपल्या दोघांकडे आहे, असेही मोदी म्हणाले. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोनवेळा राजधानी बाहेर येऊन मोदींचे स्वागत केले. अगदी राजशिष्टाचार बाजूला ठेवून दिलेला सन्मान पाहाता, भारतवासीय चीनच्या आदरातिथ्याने भारावले आहेत, असेही याप्रसंगी मोदींनी सांगितले. जिनपिंग यांना मोदी म्हणाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ काँग्रेसच्यावेळी आपण न्यू एरा (नवे युग) अशी घोषणा केली होती. मीदेखील भारतात न्यू इंडिया (नव भारत)ची चर्चा करत आहे. आपल्या दोघांचे विचार कमालीचे जुळतात, असेही मोदींनी जिनपिंग यांना सांगितले.