नवी दिल्ली: २०१४ मध्ये पंतप्रधान हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नव्हती. यावरून त्यांच्यावर बरीच टीका देखील होत होती. दरम्यान आज पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत मोदी एकटेच बोलले. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तर दिली. मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे देखील शहा पत्रकार परिषदेत म्हणाले.
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित करताना सर्वच प्रश्नांची उत्तरे अमित शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीने शहांकडे टोलवला. ‘मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,’ असे मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकाराने एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरे देण्याची आवश्यकता नाही, असे शहांनी म्हटले.
आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून निवडणुकीला सामोरे गेलो. जनता पुन्हा एकदा बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत पुन्हा येणार, हे कित्येक वर्षांनंतर देशात घडेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षांत कायम साथ दिली. अनेक चढ-उतार आले. पण देश कायम सरकारच्या पाठिशी राहिला, असं म्हणत मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.