भाजपाकडुन जय्यत तयारी : मोदींच्या सभेची उत्सुकता
जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि. १३ रोजी जळगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर यांनी दिली.
विधानसभेच्या ११ मतदारसंघासाठी भाजपाकडुन प्रचाराला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी जळगाव येथे दि. १३ रोजी दुपारी १२ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी भाजपाकडुन जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगाव येथे जाहीर सभा झाली होती. त्यानंतर यावेळेच्या लोकसभा निवडणूकीवेळी पंतप्रधान मोदी हे धुळे येथे जाण्यासाठी जळगाव विमानतळावर उतरले होते. जळगावातही त्यांची सभा होणार होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. धुळे येथे दौर्यावर जातांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर चोरून चित्रीकरण झाल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी देखिल करण्यात आली. त्यामुळे यावेळी मोदींच्या दौर्यात अशा प्रकारची घटना घडु नये म्हणून सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून बंदोबस्ताची तयारी करीत आहे.
मोदींच्या सभेसाठी जागेचा शोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपाकडुन जागेचा शोध घेतला जात आहे. शहरातील सागर पार्क मैदान येथे सुशोभिकरणाच्या कामाला सुरवात झाली असल्याने याठिकाणी सभा घेणे शक्य नाही. त्यामुळे मोदींच्या जाहीर सभेसाठी भव्य मैदान शोधले जात आहे.
सभेची उत्सुकता
जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात पंतप्रधानांची सभा होणार असल्याने ते काय बोलतात याची जिल्हावासियांसह राजकीय वर्तुळालाही उत्सुकता लागून आहे. दरम्यान दि. १३ रोजी होणार्या या सभेसाठी अभूतपुर्व नियोजन केले जाणार आहे.