श्रीनगर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गुरुवारी तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा आणि हिरानगर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. रीगल पोस्टवर तैनात असलेला एक जवान या गोळीबारात जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. मंगळवारी सांबामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहे.