नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील चार वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ मुख्यालयातील पहिला दौरा आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर अशा स्थितीत आरएसएस पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करु शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीकडे विशेष लक्ष लागून आहे.
१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. त्यामुळे निकालानंतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि रणनीती काय असेल हे पाहणं गरजेचे आहे.