पंतप्रधानांच्या हत्येचा कट

0

अहमदाबाद : आयसिस या दहशतवादी संघटनेचा हस्तक उबैद मिर्झा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार होता, तसे त्याने एका अ‍ॅपवर म्हटले होते, अशी धक्कादायक माहिती गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. पथकाने अंकलेश्वरच्या न्यायालयात मिर्झाविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

एटीएसने मिळविले संदेश

मिर्झा याचा मोबाइल आणि पेन ड्राइव्हमधून एटीएसने संदेश मिळविले आहेत, मिर्झा हा व्यवसायाने वकील आहे, त्याला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या कासिमला एटीएसने २५ ऑक्टोबर २०१७ रोजी अंकलेश्वर येथून अटक केली होती. हे दोघेही सूरतचे रहिवासी आहेत. कासिमने अटकेच्या एक दिवस अगोदर नोकरी सोडली होती आणि तो जमैकाला पसार होणार होता.

१० सप्टेंबर २०१६ चा संदेश

मिर्झा याने १० सप्टेंबर २०१६ रोजी एक संदेश पाठविला, पिस्तूल खरेदी करावयाचे आहे, त्यानंतर मी त्याच्याशी संपर्क करीन असे संदेशात म्हटले होते. मात्र कोणाशी संपर्क करावयाचा त्याचा उल्लेख नव्हता, असे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. मोदींची स्नायपर रायफलने हत्या करू असा संदेश मिर्झा याला स्वत:ला फेरारी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीकडून आला होता, असे आरोपपत्रांत म्हटले आहे.