नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेत देशात ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर भाजपप्रणीत एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात करण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले.
नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शहिदांना आदरांजली वाहिली. मोदींनी मला प्रत्येक क्षणाला अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण येत असते असे ट्वीटरवरून सांगितले.
यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते. मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे उपस्थित राहणार आहेत.