मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये त्यांची सभा होणार आहे.
या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतुक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपामधील वरिष्ठ नेतेमंडळी तसेच मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत.
पंतप्रधान मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करून जाहीर सभेद्वारे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येते.