नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी राहुल गांधी यांना आरोग्यदायी दीर्घायू लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य देवो.’ राजकारणात मोदी आणि राहुल गांधी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.
लोकसभा निवडणूकीमध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा वाढदिवस भव्य पद्धतीनं साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून राहुल गांधींचा ४९ वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्याची योजना आखली आहे.