पंतप्रधानांनी माफी मागावी-सिंघवी

0

नवी दिल्ली – प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणातून बंगळुरु शहराचा आणि कर्नाटकच्या जनतेचा अपमान करत आहेत. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. बंगळुरू शहर आणि कर्नाटक राज्य हे विकास, आकांक्षा, युवा वर्ग आणि संधीचे प्रतीक आहे. पण पंतप्रधानांनी याला पापी लोकांचे शहर म्हणून संबोधले. मोदींनी कर्नाटकी जनतेचा, शहरातील व्यापारांचा, भारताच्या सिलीकॉन व्हॅलीचा अपमान केला असल्याचे सिंघवी म्हणाले.

पंतप्रधानांनी बंगळुरू शहराला आणि नागरिकांना पापी लोकांचे शहर आणि कचऱ्याचे शहर म्हणून हिणवले होते, असे सिंघवींनी म्हटले आहे. गुरुवारी बंगळुरूमधल्या रॅलीत काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसने सिलीकॉन व्हॅली असणाऱ्या शहराचे पापी लोकांचे शहर केले आहे, गार्डन सिटीची गार्बेज सिटी केली आहे, कॉम्प्युटर सिटीची क्राइम सिटी आणि स्टार्ट-अप हबचे पॉटहोल क्लब केल्याचे म्हटले होते.

भाषणात वापरलेली ही भाषा पंतप्रधानांना न शोभणारी आहे, असे सिंघवी म्हणाले. तुम्ही (भाजप) नोकऱ्या निर्माण करु शकत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही, शेतीचा दर सर्वात कमी आहे तुम्ही कर्नाटकी जनतेला पापी असल्याचे म्हणता हे लज्जास्पद आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी अशी मागणी सिंघविंनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये भीती, निराशा वाढत आहेत. मनरेगा योजनेला भाजप सरकार दुटप्पीपणाने वागवत असल्याचे सिंघवी म्हणाले.