पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत नव्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते 21 जूनला केले जाणार आहे. तसेच महापौर दालनासह मुख्य सभेच्या सभागृहात 240 सदस्यांच्या, 150 प्रेक्षकांच्या आणि 60 अधिकाऱ्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेसहीत अत्याधुनिक देखण्या सभागृहाचे लोकार्पण उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज अशी ही नवी पाचमजली इमारत तब्बल 14 हजार चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारली असून 72 फूट व्यासाचे गोल घुमटाचे मुख्य सभागृह असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित राहणार आहेत
इमारत अत्याधुनिक सोई सुविधांनी सज्ज
ही नवी इमारत ही अत्याधुनिक सोई सुविधांनी सज्ज असून त्यामध्ये अद्ययावत वातानुकूलित यंत्रणा, 6 उद्वाहने, एलईडी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम बसविण्यात आली आहे. सदर इमारतीचे बांधकाम पर्यावरणपूरक बाबींचा विचार करून करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनेही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टिम बसविण्यात आली आहे. या सर्व कामासाठी सुमारे 48 कोटी 75 लाख रूपये इतका खर्च आला आहे.