कवितेने सातासमुद्रापार ओळख दिली

हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांचे मत, भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे सत्कार

भुसावळ प्रतिनिधी दि 31

कविता अभिव्यक्त होण्याचं सशक्त माध्यम आहे. स्वतःच्या मर्यादेपलीकडे नेण्याचे काम ती करते. ‘पोरी शाळेत निघाल्या’ या कवितेने सातासमुद्रापार मला ओळख मिळवून दिली. त्याचे मोल शब्दातीत आहे, अशी भावना हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांनी शनिवारी भुसावळात व्यक्त केली.’पोरी शाळेत निघाल्या’ ही गणेश आघाव यांची कविता 32 आंतरराष्ट्रीय भाषा व सर्वच बोलीभाषेत अनुवादित झाली आहे. आता तिचा जपानी भाषेत अनुवाद झाला असून ती ह्या देशात अभ्यासात समाविष्ट होते आहे. निमित्ताने भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी संवाद साधताना आघाव यांनी त्यांचा काव्यप्रवास उलगडला. फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, समन्वयक गणेश फेगडे, राहूल भावसेकर यांच्यासह पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

 

*कवितेने काळीजवाटा तयार केल्या*

कवितेने माझ्या सारख्या शेतकरी लेकराला मानमरातब मिळवून दिला. महाराष्ट्रभर हजारो विद्वान, रसिक? गुणज्ञ यांचे प्रेम लाभले. मधाचा गोडवा असलेल्या शब्दांनी कधीही न मिटणाऱ्या काळीजवाटा तयार केल्या. ‘पोरी शाळेत निघाल्या’ कविता दोन हजार शाळांच्या फलकांवर झळकली हा मोठा सन्मान आहे,असे कवी आघाव म्हणाले.

‘कवी आपल्या भेटीला’ या उपक्रमात राज्यभरात अडीच हजार कार्यक्रम झाले. त्यात ‘पोरी शाळेत निघाल्या’ कविता सादर केल्यावर लेकीबाळींना गहिवरून येते. त्याचं हे प्रेम माझ्या कविमनाला लिखाणाचे बळ देते. साहित्य साधना करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार मनाला स्पर्श करता कामा नये, असा सल्लाही कवी आघाव यांनी संवाद साधताना दिला.