पोलीस ‘कलेक्टर’ म्हणताहेत ‘ऐसा क्या गुनाह किया लुट गए’

0

पुन्हा कंट्रोल जमा केल्याची खंत; एसपींच्या तडकाफडकी आदेश काढण्याची नेमकी भूमिका समजेना?

। किशोर पाटील

जळगाव- तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कार्यकाळापासून ‘पोलीस कलेक्टर’ हा शब्द चर्चेत आला? अवैधधंद्याशी सलगी अन् अवैधधंदे व्यावसायिकांशी हितसंबंध जोपासणार्‍या कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा करुन नवचैतन्य कोर्सच्या माध्यमातून तत्कालीन अधीक्षक शिंदे यांनी कारवाईची बडगा उगारला? यानंतर किती आणि कोणत्या कर्मचार्‍यांमध्ये सुधारणा झाली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र कलेक्टर या नावाचा संबंधित कर्मचार्‍यांवर लागलेला ठपका पुसता पुसायचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. यापैकीही काहींच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या झाल्या. आहे त्या ठिकाणी इमानेइतबारे काम करुन आपली कलेक्टर म्हणून ओळख पुसण्याचा काहीजण प्रयत्न करत असतांना सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी ‘त्या’ 72 कर्मचार्‍यांची मुख्यालयात उचलबांगडी केली. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर हातून झालेल्या एका चुकीमुळे आयुष्यभर पश्‍चातापाची वेळ आली आहे. ‘ऐसा क्या गुनाह किया लुट गऐ’ या हिंदी चित्रपट गीताप्रमाणे मुख्यालयात जमा झालेल्या प्रत्येकाची नाराजी व्यक्त होत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी त्या 72 कर्मचार्‍यांची तडकाफडकी मुख्यालयात उचलबांगडी केली. उगले यांच्या अचानकच्या भूमिकेमुळे तसेच बदलीच्या आदेशाने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अशी कुठलीही मानसिकता किंवा कल्पनाच नसताना अचानक कर्मचार्‍यांना मुख्यालयात हजर होण्याचे आदेश हातात पडताच अनेकांची भंबेरी उडाली. मात्र, साहेबांचे आदेश असल्याने सर्वच्या सर्व कर्मचारी आदेशानुसार नियंत्रण कक्षात हजर झाले.


काय रे तुलाही जमा केले का?
अधीक्षक शिंदे यांनी नवचैतन्य कोर्सच्या दोन महिन्यांच्या काळात 72 कर्मचारी दिवसरात्र सोबत होते. कोर्स म्हणजेच किंवा नियंत्रण कक्षात बदली म्हणजे कर्मचार्‍यांसाठी एकप्रकारची शिक्षा असते. दोन महिन्यांनंतर हे कर्मचारी पूर्ववत ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये हजर झाले. नवचैतन्यला काही दिवस लोटत नाही तोच या कर्मचार्‍यांना अधीक्षक उगले यांनी मुख्यालयात जमा केले. नवचैतन्याच्या वेळी जमलेले आता पुन्हा ‘कॅप्सुल’कोर्ससाठी हजर झाले. यावेळी कर्मचारी एकमेकांना उद्देशून ‘अरे तुलाही साहेबांनी जमा केले का?’, असे म्हणत नवचैतन्य कोर्सच्या आठवणी रंगविल्याची गमतीशीर माहिती मिळाली आहे.


कसा पुसायचा ‘कलेक्टर’चा ठपका?
जळगावात अवैधधंदे बंद आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधधंदे बंद असल्याचा दावा त्या 72 कर्मचार्‍यांपैकी काही कर्मचार्‍यांकडून केला जात आहे. मुळातच ज्या ठिकाणी नियुक्ती असतांना ‘कलेक्टर’ शिक्का लागला त्या पोलीस ठाण्यातून काहींची दुसर्‍या ठाण्यात बदलीही झाली. असे बदली झालेले कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी नेमून दिलेले काम पार पाडत असतांनाच अचानक त्यांना मुख्यालयात हजर होण्याचे आदेश झाले. अधीक्षक शिंदे यांनी ज्या कर्मचार्‍यांना कंट्रोल जमा केले होते, त्याच कर्मचार्‍यांना उगले यांनी कंट्रोल जमा केले. त्यामुळे शिंदे यांच्या काळात लागलेला ‘कलेक्टर’चा ठपका पुसायचा कसा? साहेबांनी पुन्हा आम्हालाच का जमा केले? इतरांना का नाही? असा सवाल नियंत्रण कक्षात हजर झालेल्या काही कर्मचार्‍यांनी उपस्थित केला असून, अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली आहे.


कॅप्सुल कोर्सबाबत एसपींची भूमिका समजेना?
निंबोल येथील विजया बँकेचा दरोडा, बेपत्ता चिमुकल्यांच्या मृतदेह सापडल्याच्या घटना जामनेर, चाळीसगाव तालुक्यात समोर आल्या. या गुन्ह्यांचा उलगडा झालेला नाही. संशयितांच्या छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे मात्र, प्रयत्नांना अपयश येत आहे. अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षक उगले यांनी शनिवारी तडकाफडकी 72 कर्मचार्‍यांची उचलबांगडी करुन त्यांच्यासाठी कॅप्सुल कोर्सचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे हाही खरा प्रश्‍न आहे. ‘साहेबांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून…’ या म्हणीप्रमाणे अनेकांनी साहेबच बरोबर असल्याचे म्हणत न बोलता चुप्पी साधली आहे.


आत्मविश्‍वास वाढेल की मनोबल खालावेल
नवचैतन्य कोर्सलाही ते 72 कर्मचारी सामोरे गेले आहेत व आता कॅप्सुल कोर्सलाही सामोरे जाणार आहे. कॅप्सूल कोर्समध्ये नेमका किती दिवसाचा? या कोर्समध्ये नेमके काय? हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र अधीक्षकांनी या कोर्समध्ये समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. आता ‘कलेक्टर’चा ठपका लागून त्या कारणाने दोनदा नियंत्रणकक्षात जमा झालेल्या कर्मचार्‍यांचा कॅप्सूल कोर्समधून बाहेर पडल्यावर आत्मविश्‍वास वाढेल का? नियंत्रण कक्षातील दोनदा उचलबांगडी झाल्याने आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलेल या विचारात मनोबल खचेल? हे येणारा काळच ठरवेल.