सतर्कतेत पोलीस प्रशासन पास

0

भुसावळ बसस्थानकानजीक पोलीस उपअधीक्षकांनी घेतली पोलिसांची चाचणी

भुसावळ: भुसावळ बसस्थानकावर दोन गटात हाणामारी झाली असून अनेक जण रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आहेत, तातडीने पोलिसांची कुमक पाठवा, असा संदेश शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांसह नगरपालिका रुग्णालयातील रुग्णवाहिकेसह पालिकेच्या अग्निशमन दलाला पोलिस उपअधीक्षकांनी कळवताच यंत्रणेत खळबळ उडाली. पोलिस दलाच्या वाहनांसह दुचाकीवरून कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली मात्र घटनास्थळावर सर्व काही सुरळीत असल्याचे पाहताच यंत्रणाही बुचकळ्यात पडली तर अचानक रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कुमक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमल्यानंतर शहरात अफवांचे पेवही फुटले मात्र पोलिस उपअधीक्षकांनी सर्वांना जवळ बोलावून ही सतर्कतेची चाचणी (मॉक ड्रील) असल्याचे सांगताच यंत्रणेला हायसे वाटले. दरम्यान, पोलिसांनी कळवल्यानंतर एक तास उलटूनही पालिकेचा अग्निशमन बंब व रुग्णवाहिका न आल्याने एकूणच बेकिरीही उघड झाली

तत्काळ पोहोचले पोलीस निरीक्षक

एरव्ही पोलिसांकडून मॉक ड्रील घेताना पोलिसांना कल्पना दिली जात असे त्यामुळे कर्मचारीदेखील निर्धास्त राहत असत मात्र मंगळवारी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी पोलिसांमधील सतर्कता प्रत्यक्षात तपासण्यासाठी स्वतः बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गाठला. पाच वाजेच्या सुमारास त्यांनी शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांना तसेच निरीक्षकांना बसस्थानकात दोन गटातील तुंबळ हाणामारीची माहिती कळवून भ्रमणध्वनी कट केला. संवेदनशील शहरात यापूर्वी झालेल्या अप्रिय घटना पाहता पोलिस दलही या दूरध्वनीने पुरते हादरले. शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी क्षणही न दवडता कर्मचार्‍यांना सूचित करीत सर्वात आधी घटनास्थळ गाठले त्यानंतर तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकारी आले तसेच बाजारपेठ पोलिसांचे डीबी पथक तसेच सहा.निरीक्षक रावसाहेब किर्तीकर, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, शहरचे उपनिरीक्षक वैभव पेठकर यांनीही घटनास्थळ गाठले.

पाच वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी येण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक्षकांनी केल्या मात्र मॉक ड्रील संपून सायंकाळचे सहा वाजले तरी दोन्ही वाहने न आल्याने पोलिस प्रशासनाने पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर वाहने पेटवली, त्यावेळीदेखील पालिकेचा अग्निशमन बंब वेळीच न पोहोचल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते हे देखील विशेष !

शहरात फुटले अफवांचे पेव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती मोठ्या संख्येने जमलेल्या अधिकारी व हत्यारधारी पोलिसांना पाहताच शहरातील वाहनधारकांसह नागरीकांमध्ये विविध अफवांचे पेवही फुटले. रेल्वे स्थानकानजीक पोलिसांची गर्दी पाहून प्रवाशांमध्येही धडकी भरल्याने ऐकमेकांना त्यांनी कुतूहलाने काय झाले याबाबत विचारणा केली तर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचे फोनही खणखणले व नेमक्या घटनेबाबत विचारणा झाली मात्र हा केवळ पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी मॉक ड्रील असल्याचे कळताच नागरीकांनीही सुटकेचा श्वास घेतला. यावेळी गर्दीदेखील झाली होती.