पोलीस कोठडीचा ह्क्क राखीव ठेवून केले न्यायालयात हजर ; चिंग्यासह एकाचा ताब्यासाठी पत्रव्यवहार
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील कारागृहातील कैद्याने कारागृहाबाहेर येवून मद्यप्राशन करुन धिंगाणा घालत एका प्रौढाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा असलेल्या या प्रकरणात हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी तिघांची कारागृहात रवानगी केली. दरम्यान, कारागृहात असलेल्या चिंग्या आणि त्याचा साथीदार लखन या दोघांना अटक करण्यासाठी तपासाधिकारी विशाल सोनवणे यांनी न्यायालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. सोमवारी दोघांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.
खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याने 13 रोजी न्यायालयाचे कामकाज आटोपल्यानंतर चिंग्याने गार्ड ड्युटीला असलेल्या पोलिसांसोबत खासगी कारने तुकारामवाडीत जावून अरुण भिमराव गोसावी (43, रा. तुकारामवाडी) यांना कारमध्ये डांबून कारागृहासमोर नेवून मारहाण केली होती. या प्रकरणी चिंग्या उर्फ चेतन आळंदे, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना जळगावातून एकाला चाळीसगावातून घेतले ताब्यात
या गुन्ह्यातील संशयित पोलीस हवालदार मुकेश पाटील हा चाळीसगावला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सचिन मुंडे, महेंद्र पाटील या कर्मचार्यांनी मुकेश यास चाळीसगाव येथून ताब्यात घेण्यात आले. गोरख पाटील हा सिल्लोड येथून थेट पोलीस स्टेशनला आला तर सपकाळे याला पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे यांच्यासह गोविंदा पाटील, निलेश पाटील यांनी पोलीस लाईनीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. तपासाधिकारी विशाल सोनवणे यांनी तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी तपासाधिकार्यांनी केली होती. त्यानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
गार्डड्युटीवरील पोलीस चिंग्याचा खास मित्र
चिंग्या सोबत गेल्या काही वर्षापूर्वी घटनेच्यावेळीही गार्ड ड्युटीवर मुकेश पाटील हाच कर्मचारी होता. त्यावेळी वाद झाल्याने मुकेश पाटील यास निलंबित करण्याची आल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही पुन्हा यावेही चिंग्याला बाहेर आणल्यावर मारहाणीची घटना घडली त्यावेळी मुकेश पाटील हाच गार्डड्युटीवर होता. चिंग्याला कारागृहाबाहेर आणल्यानंतर मुकेश पाटीलची कशी गार्डड्युटी असते, हा प्रश्न आहे. दरम्यान मुकेश हा चिंग्याचा खास मित्र असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी मुकेश पाटीलसह गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.