पोलीस ठाण्यानजीक कपड्यांचे दुकाने फोडले

0

भुसावळ शहरातील रेल्वेपुलाजवळील घटना: पाच हजारांच्या रोकडसह ५० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला

भुसावळ : शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे लोखंडी पुलाजवळील देवडा रेडीमेड स्टोअर्स या दुकानातून चोरट्यांनी पाच हजारांच्या रोकडसह टी शर्ट, बनियन, अंडरपॅन्ट, रेनकोटसह शर्ट आदी मिळून 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरातील व्यापारीवर्गात भीती पसरली आहे. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत देवडा स्टोअर्समध्ये चोरी होण्याची ही तिसर्‍यांदा घटना असल्याने माहितगार चोरट्यांनी ही चोरी केल्याचे बोलले जात आहे. चोरी प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

छताचे सिलिंग तोडून केली चोरी

रेल्वे लोखंडी पुलानजीक संदीप देवडा यांचे ‘देवडा रेडिमेड’ स्टोअर्स आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री दुकानाच्या वर चढत दुकानावरील पत्रे काढून छत तोडत दुकानात प्रवेश करीत दुकानातील कपड्यांची फेकाफेक केली. प्रवेशासाठी चोरट्यांनी पत्र्याच्या टपरीला लागलेले पत्रे तसेच नटबोल्ट काढून पीओपी सिलिंगही तोडत खुर्चीवर अलगद पाय ठेवून दुकानात प्रवेश मिळवला. शनिवारी सकाळी दुकानाचे संचालक संदीप देवडा यांनी 8.45 वाजता दुकान उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

50 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला

छत तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत दुकानात दिवाळीच्या पार्श्वभुमीवर नव्याने विक्री साठी आणलेले टी शर्ट, कुर्ता, रेनकोट, बनियन, अंडरपॅन्ट असा सुमारे 45 तसेच रोकड पाच हजार मिळून 50 हजारांचा मुद्देमाल लांबवला. दरम्यान, चोरट्यांनी दुकानातील रॅकवरील बनियन, अंडरपॅन्टचे खोके काढत त्यातील त्यांना हवे असलेले कपडे काढून घेत अन्य कपडे तसेच रीकामे खोके दुकानातच फेकत पळ काढला. दुकानात सीसीटीव्ही नसल्याची बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. दरम्यान, यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी व गत गणपतीच्या उत्सवात याच दुकानात चोरी झाली हेदेखील विशेष!