जळगाव जिल्हा पोलिस दलाने घेतला निर्णय ; 21 जूनपासून महामार्गावर पथक तयार करून करणार तपासणी
जळगाव – आपण दुचाकी वाहनधारक असाल, आणि महामार्गावरुन विना हेल्मेट प्रवास करत असाल तर , खबरदार… जिल्हा पोलीस दलाने पुन्हा महामार्गावर 21 पासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. नियम मोडणार्या दुचाकीस्वारास 500 रुपयांचा दंड होणार आहे. सुमारे 13 वर्षांपासून महामार्गावर हेल्मेट सक्तीचा विषय अजेंड्यावर आला आहे. यात दोन वेळा सक्तीही करण्यात आली; पण काही दिवसांनंतर पुन्हा सक्ती उठवली गेली. आता पुन्हा हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश पोलिस दलाने गुरुवारी दिले आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दोन महिन्यांपासून महामार्गावर होणार्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 15 मे रोजी पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन अपघात स्थळांची पाहणी केली होती. अपघातामध्ये मृत होणार्या तरुणांची संख्या जास्त असल्याचे या पाहणीतून समोर आल्याने संबंधित अपघात होणार्या स्थळांना ’ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले होते.
जनजागृतीसाठी लावले फलक
महामार्गावर हेल्मेट वापरण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून जनजागृती करण्यात येते आहे. त्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. यात हेल्मेट न वापरल्यामुळे होणार्या अप्रिय घटनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पोलिस, वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी स्वत: महामार्गावर पथक तयार करून तपासणी करणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.
यापूर्वी कर्मचार्यांपासून झाली होती नियमाला सुरुवात
गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गावर दोन वेळा हेल्मेटसक्ती करण्यात आली. तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी तर पोलीस कर्मचार्यांपासून हेल्मेट सक्तीची सुरुवात केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करणार्या प्रत्येक कर्मचार्यांला नियम लागू केला होता. न पाळणार्यांकडून स्वतः 500 रुपये दंडही वसूल केला होता. त्यांची बदली झाल्यानंतर हा नियम पुन्हा बंद झाला होता. त्यामुळे आता 21 जूनपासून होणारी हेल्मेटसक्ती अविरत सुरू ठेवण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या समोर आहे.