माघारीकडे जिल्हावासियांचे लक्ष : बंडखोरांना रोखण्यासाठी राजकीय पक्षांची दमछाक
जळगाव – राज्यात युती आणि आघाडी जाहीर असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र युतीधर्माला आणि आघाडीला छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्यातील पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव शहर व ग्रामीण, भुसावळ, चाळीसगाव याठिकाणी युती व आघाडीच्या ईच्छुकांनी दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान उद्या दि. ७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची अंतीम मुदत आहे. या बंडखोरांना रोखण्यासाठी राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक होत आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर उद्या दि. ७ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. जळगाव जिल्ह्यात सात ठिकाणी बंडखोरी करण्यात आली आहे. ही बंडखोरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. जळगाव शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला सुटल्याने काँग्रेसच्या डॉ. राधेशाम चौधरी यांनी बंडखोरी करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या ना. गुलाबराव पाटील यांच्यासमोर भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, लक्ष्मण पाटील, चंद्रशेखर अत्तरदे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर याच मतदारसंघातुन राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर व राष्ट्रवादीच्या जि.प. सदस्यांचे पती रविंद्र देशमुख यांनीही उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविली आहे. पाचोरा मतदारसंघातुन शिवसेनेच्या आमदार किशोर पाटलांविरोधात भाजपाचे तथा ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अमोल शिंदेंची उमेदवारी आ. किशोर पाटलांसाठी अडचणीची ठरू शकते. भुसावळ मतदारसंघातही भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या विरूध्द त्यांच्याच पक्षाच्या डॉ. मधु मानवतकर देखिल रिंगणात आहे. तर राष्ट्रवादीकडुन पिरिपाचे जगन सोनवणे हे उमेदवारी करत असुन त्यांच्या विरोधात सतीश घुले यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. तसेच काँग्रेसतर्फे संजय ब्राम्हणे यांनी देखिल उमेदवारी अद्यापपर्यंत कायम ठेवली आहे. मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहीणी खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीकडुन अॅड. रवींद्र पाटील रिंगणात आहे. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी ही खडसेंसाठी अडचणीची ठरू शकते. चोपड्यात राष्ट्रवादीच्या जगदीश वळवी यांच्याविरूध्द पक्षाचे माजी सभापती डी.पी. साळुंखे, माधुरी पाटील यांनी उमेदवारी केली आहे. तर शिवसेनेच्या लताबाई सोनवणे यांच्याविरोधात भाजपाचे सभापती प्रभाकर सोनवणे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. चाळीसगाव मतदारसंघात भाजपाचे मंगेश चव्हाण यांच्याविरूध्द भाजपाचेच डॉ. विनोद कोतकर यांनी दाखल केलेली उमेदवारी नुकसान देऊ शकते.
बंडोबांना थंड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
राज्यात युती, आघाडी जाहीर झाली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी तिकीट किंवा जागा न सुटल्याने उमेदवारी केलेल्या बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडुन शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. उद्या दि. ७ रोजी सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंत माघारीची अंतीम मुदत राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या या माघारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.