जिल्ह्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी माझीच – ना. गिरीश महाजन

0

खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही : बंडखोरीचा आम्हाला फटका

जळगाव – जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजपाच्या जागा कमी झाल्या. काही जागांवर आमचा पराभव झाला. यशाप्रमाणे पराभवाचीही जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझीच असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान अनिल चौधरींसंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेल्या अदृश्य शक्तींच्या विधानाला काही अर्थ नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे आज जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ना. महाजन यांनी सांगितले की, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित असे यश मिळाले नाही. बंडखोरीचा फटका आम्हाला देखिल बसला. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र याठिकाणी देखिल आमच्या जागा कमी झाल्या. राज्यात किमान १४० जागा निवडून येतील असा आमचा अंदाज होता. मात्र ३५ जागांचा आम्हाला फटका पडला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी माझीच असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.


खडसेंच्या म्हणण्याला अर्थच नाही
रावेर मतदारसंघात हरीभाऊ जावळे यांच्या पराभवाला अनिल चौधरी हे कारणीभूत असुन त्यांच्यामागे पक्षातीलच अदृश्य शक्ती होती असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला होता. यासंदर्भात ना. महाजन यांनी सांगितले की, खडसेंच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. हरीभाऊ असे म्हणत आहे का? असा प्रतिप्रश्‍न देखिल त्यांनी उपस्थित केला.


राज्यात मुख्यमंत्री भाजपाचाच
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी अजुन ९ तारखेपर्यंत वेळ आहे. त्याच्याआधी सरकार स्थापनेचा तिढा सुटेल असा विश्‍वास ना. महाजन यांनी व्यक्त केला. तसेच संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी आम्ही फार काही बोलायचे नाही असे ठरविले आहे. संजय राऊत यांचे आम्ही ऐकुन घेत आहोत अन्यथा उत्तरे आम्हालाही देता येतात असे सांगत राज्यात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असल्याचा पुनरूच्चार ना. महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.