राजकारण गेलं चुलीत…परंपरा कायम राखणार ! : पक्ष फुटला मात्र कुटुंब एकसंघच…
पवार कुटुंबीय यंदाही सोबतच दिवाळी साजरा करणार
बारामती, वृत्तसंस्था – पवारांची दिवाळी कालही एकत्र होती आजही एकत्र आहे. उद्याही एकत्रच राहील. आमच्यात राजकीय मतभेद जरूर निर्माण झाले. मात्र, राजकीय मतभेद आणि कौटुंब हे वेगळे आहे. परिणामी कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या कुणीही डावलू नये या मताची मी आहे अशा शब्दात पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरा होणार असल्याचे खा.सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले. पवार कुटुंबीय यंदाचा दिवाळी दसरा एकत्र साजरा करणार का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
दिवाळी पाडवा सहकुटुंब एकत्रितपणे साजरा करण्याची अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीयांची परंपरा आहे. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक व विविध पक्षाचे नेते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी येत असतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा कसा साजरा करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याच पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले.
बारामतीतील गोविंद बाग हे केवळ पवार साहेबांचं निवासस्थान नसून तमाम महाराष्ट्रातील जनतेचे माहेराचं आणि अधिकाराच, हक्काचं घर आहे. त्यामुळे गोविंद बाग हे वर्षातील ३६५ दिवस महाराष्ट्रासह देशभरातील जनतेसाठी सदैव खुले आहे. या घरावर जेवढा माझा हक्क आहे. त्याहून जास्त मायबाप जनतेचा आहे, असे सुळे यांनी सांगितले.