बंगळूर । मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. तेव्हा ही निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडण्याचे आदेश आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या निवडणुकांची घोषणा करताना देखील निवडणुका मुक्त वातारणात पार पाडण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला होता. कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंड झाल्या असून १० तारखेला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत असले तरी कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने काँग्रेस, भाजप आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद लावली आहे. गेल्या काही काळापासून राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यावर भर देत असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुक आयोग याच मुद्द्यांचा विचार करत कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार मुक्त निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असल्याचं पहायला मिळत आहे. कर्नाटकात सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यातील बऱ्याच ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच अहवालानुसार, या निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या छापेमारीत २०१८ विधानसभा निवडणुकांच्या तुलनेने ४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
३७५ कोटीची मालमत्ता जप्त
»» कडेकोट बंदोबस्त तसेच आजूबाजूच्या राज्यांशी समन्वय साधत कर्नाटकातील निवडणुकांच्या काळात होणाऱ्या अवैध व्यापारावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटकामध्ये ३७५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची नोंद झाली आहे. तसेच आचारसंहिता लागू केल्यानंतर कर्नाटकात २८८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.