कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पोष्टरबाजी

0

कोल्हापूर: विधानसभा निकालात अपेक्षेपेक्षा भाजपाच्या जागा कमी आल्या आहेत. भाजपाच्या एकहाती सत्ता मिळवण्याच्या मनसुब्यांना या निकालामुळे हादरा बसला असल्याचे बोलले जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या कोल्हापुरात भाजपाला जोरदार धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत भाजपाला कोल्हापुरात एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा भाजपामुक्त झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत भाजपाला डिवचलं आहे.

‘बाप बापच असतो’ असा मजकूर असलेले बॅनर राष्ट्रवादीकडून कोल्हापुरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा फोटो आहे. कोल्हापुरात भाजपाचे दोन आमदार होते. त्यांना भाजपानं उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपा आमदार अमल महाडिक यांना काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी पराभूत केलं. तर भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांचा काँग्रेसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या प्रकाश आव्हाडेंनी पराभव केला.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या सात जागांवर महाआघाडीनं विजय मिळवला. जिल्ह्यात काँग्रेसनं चार, राष्ट्रवादीनं दोन तर जनसुराज्य पक्षानं एका जागेवर विजय नोंदवला. याशिवाय काँग्रेसमधून बाहेर पडून आमदार झालेले प्रकाश आव्हाडे महाआघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. तर इतर दोन मतदारसंघांतल्या जनतेनं शिवसेनेला कौल दिला आहे. गेल्या निवडणुकीत महायुतीनं जिल्ह्यातल्या १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता महायुतीकडे दोन जागा आहेत. जिल्ह्याला बसलेल्या पुराचा फटका भाजपादेखील बसल्याचं निकालानंतर बोललं जात आहे.