निवडणूक व्यवस्थापनासाठी माहीर असलेले प्रशांत किशोर यांचा जदयूत प्रवेश

0

पाटणा-निवडणुक व्यवस्थापनात तरबेज असलेले आणि इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक)चे संस्थापक प्रशांत किशोर आता खुद्द राजकारणाच्या मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड(जदयू)मध्ये प्रवेश केला आहे.

आज रविवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू कार्यकारिणीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला. बिहार विधानसभेच्या २०१५ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना चकित करणारे ‘निवडणूक व्यवस्थापन गुरू’ प्रशांत किशोर यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे. २०१५ ला ऑक्टोबरमध्ये टांझानियात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले जॉन मॅगफली यांच्या प्रचाराची जबाबादरीही प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ संस्थेकडेच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘चाय पर चर्चा’ असो की ‘थ्रीडी सभा’ या नव्या कल्पना प्रशांत किशोर यांच्याच होत्या. या माध्यमातून मोदी देशातील अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचले होते.

अनेक दिवसांपासून किशोर हे राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या, पण नेमक्या कोणत्या पक्षात ते जाणार हे स्पष्ट नव्हतं, आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळी प्रशांत कुमार यांनी स्वत: ट्वीट करून आपला नवा प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर त्यांनी जदयूमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांसोबत काम केले आहे. मात्र, भाजपाच्या ऐतिहासीक विजयानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काहीतरी बिनसल्याची चर्चा होती, त्यानंतर त्यांनी भाजपाची साथ सोडली. नंतर लोकसभेत मोदींसाठी जशा नव्या कल्पना वापरल्या होत्या अगदी तशाच कल्पना प्रशांत यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यासाठी वापरल्या होत्या आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. याशिवाय पंजाबमध्येही त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं.