शिंदखेडा(प्रतिनिधी )- भारतीय सेवादलातून सेवानिवृत्त झालेले प्रविण बडगुजर यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. भारतीय सेवा दलात 22 वर्ष नोकरी केल्यानंतर प्रवीण बडगुजर शिंदखेडा येथील जन्म भूमीत परत आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय सेना दलात हवालदार या पदावर देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण कॉलनीत राहणारे प्रवीण बडगुजर 2001 साली भारतीय सेना दलात दाखल झाले. हैदराबाद येथील ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथे त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली. बावीस वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी देशाच्या जम्मू काश्मीर, लेह लडाख, इलाहाबाद, जयपुर, दिल्ली, चंदीगड, आसाम, भटिंडा अशा विविध भागांमध्ये सेनादलात देश सेवा केली. हवालदार या पदावर असताना ते देशसेवेतून सेवानिवृत्त झाले. शिंदखेडा या जन्मभूमीत आल्यावर त्यांची भगवा चौकापासून स्टेशन रोड लक्ष्मीनारायण कॉलनीतुन मिरवणूक काढण्यात आली. भगवा चौकात नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, माजी पंचायत समिती सभापती प्रा. सुरेश देसले, विरोधी गटनेते सुनील चौधरी, उल्हास देशमुख, उपनगराध्यक्ष भिला पाटिल, शहराध्यक्ष प्रविण माळी, खान्देश ग्रुपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, शांताराम जाधव, नामदेव येळवे, संजीवकुमार नगराळे, दादा मराठे, राजेंद्र मराठे, ॲड.बी.झेड. मराठे , विनायक पवार, . पोलीस निरीक्षक दिपक पाटील, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, शांताराम जाधव, सुभेदार पी.जी. जोशी, रविंद्र अहिरे, भावसिंग गिरासे, ईश्वर सोनवणे,भटु चौधरी, बाबुलाल जगदाळे, कैलास ठाकरे, सोमनाथ बडगुजर, नथ्थु सुर्यवंशी, योगेश कोळी यांनी सत्कार केला. मिरवणूकीत असंख्य महिलांनी औक्षण केले. त्यानंतर काकाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या सत्कार समारंभात बडगुजर समाजातर्फे प्रवीण बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला . हयावेळी नथ्थु बडगुजर,विक्रम बडगुजर, सुनील बडगुजर उपस्थित होते .
यावेळी प्रवीण बडगुजर यांनी सैन्य दलात सेवा देत असतानाच्या काही आठवणी सांगितल्या जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर भागात सर्व दूर बर्फाचे बंकर आहेत. या बंकर मध्ये राहुन चार महिने देश सेवा करायची संधी मिळाली. शासनातर्फे पुरेशा प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल याचा पुरवठा असल्याने या भागात विविध ठिकाणी आगीच्या भट्ट्या सुरू असतात. या भट्टीवर जाऊन बर्फ वितळून झालेले पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. बर्फाळ प्रदेशामुळे रस्ते पूर्ण बंद असल्याने हेलिकॉप्टरच्या साह्याने अन्नपुरवठा होत असे. शून्य अंश तापमानात चार महिने देश सेवा करण्याची संधी मिळाली.
भारतीय सैन्य दलात श्रीनगर येथे देशसेवा करीत असताना 2005 साली भूकंप आला. या भागात झालेल्या भूकंपात आम्ही अडकलो होतो. भूकंप भागातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही झटत होतो. हे करत असताना भूकंप भागात मी अडकलो. आम्हाला त्या ठिकाणाहून निघणे अवघड झाले होते अशा परिस्थितीत काय करावे हे सुचत नव्हते. परंतु भारतीय सेनादलात मिळालेल्या ट्रेनिंगमुळे आम्ही या प्रसंगातून सुखरूप बचावलो.
भारतीय सैन्य दलात देशसेवा करीत असताना 2018 साली उल्फा आतंकवादयांशी चकमक झाली. आतंकवाद्यांशील झालेली ही चकमक अंगावर शहारे आणणारी होती. भारतीय सेना ही एक सशक्त सेना असल्याने उल्फा आतंकवाद्यांना धुळ चारण्यात आम्ही यशस्वी झालो. यासारख्या अनेक आठवणी बावीस वर्ष देश सेवा करीत असतानाच्या आहेत.
****प्रविण बडगुजर —
सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करण्याची लहानपणापासून इच्छा होती. सेनादलात दाखल झालो त्यावेळी अतिशय आनंद झाला. यामुळे जीवनाला एक दिशा मिळाली आहे. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालो असलो तरी पुन्हा देश सेवा करण्याची संधी मिळाल्यास सैन्यात दाखल होऊ .