प्रीती झिंटा आणि विरेंद्र सेहवाग यांच्यात वाद

0

मुंबई :- किंग्ज इलेव्हन पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटा आणि संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवाग यांच्यात वाद निर्माण झाला आहे. राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर संतप्त झालेल्या प्रितीने सामन्याच्या रणनितीवरुन थेट सेहवागला जाब विचारला. मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबला 15 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या लढतीत राजस्थानने पंजाबपुढे 159 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला 143 धावाच करता आल्या. एक बाजू लावून धरणाऱ्या लोकेश राहुलने केलेल्या 95 धावांच्या जिगरबाज खेळीनंतरही पंजाबचा संघ विजयापासून दूर राहिला होता.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रविचंद्रन अश्विनला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. संघात करुण नायर आणि मनोज तिवारीसारखे फलंदाज असतानाही अश्विनला फलंदाजीत बढती देऊन वरच्या फळीत पाठवण्यावरही तिने नाराजी व्यक्त केली. तसेच पराभवाचे खापर वीरू आणि त्याने केलेल्या प्रयोगांवर फोडले. मात्र या सर्व प्रसंगात सेहवागने प्रीतीला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. पराभवानंतर डगआऊटमध्ये येत प्रीतीने प्रश्नांची सरबत्ती करत केलेल्या पाणउताऱ्यामुळे वीरू दुखावला आहे. झालेल्या वादामुळे वीरेंद्र सेहवाग लवकरच किंग्स इलेव्हन पंजाबला अलविदा करण्याची शक्यता आहे. परंतू सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर पाच वर्षांचा करार केला आहे.