नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अभिभाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. केंद्र सरकारची उपलब्धी आणि भविष्यातील कामावर राष्ट्रपतींनी भाष्य केले. सोबतच प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. देशाच्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा झालेला अपमान दुर्दैवी आहे. प्रजासत्ताक दिन देशासाठी पवित्र आहे. अशा पवित्र दिनी तिरंग्याचा झालेला अपमावन दुर्भाग्यपूर्ण आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात कोरोना काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत यावर भर दिला.
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले. चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असे राष्ट्रपती म्हणाले.
कोरोना काळात केंद्र सरकारने चांगली कामगिरी केली आहे, जगभरात याचे कौतुक झाले हे भारतासाठी मोठी उपलब्धी आहे असेही राष्ट्रपतींनी सांगितले.