भारताचे 14 वे राष्ट्रपति कोविंद की मीराकुमार याचा गुरुवारी होणार फैसला

0

नवी दिल्ली/मुंबई | भारताचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी संसदेसह प्रत्येक राज्यातील विधीमंडळात उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) रामनाथ कोविंद आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) मीराकुमार यांच्यात कोण बाजी मारते, त्याचा फैसला गुरुवारी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसदेतील मतमोजणीत होईल. सर्व राज्यांच्या विधीमंडळातील मतपेट्या मतदान आटोपल्यानंतर बंदोबस्तात दिल्लीला रवाना केल्या गेल्या. दरम्यान, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे.

मोदी पोहोचले वेळेआधीच
कडक शिस्तीचे, वक्तशीर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला दहा मिनिटे असताना वेळेआधीच संसदेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे अधिकारी गांगरले, त्यांचा गोंधळ उडाला. मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही होते. यावेळी आपल्या शाळेतील वेळेआधीच पोहोचण्याची आठवण सांगून मोदींनी वातावरण हलके-फुलके केले.

राज्यात 287 आमदारांचे मतदान
महाराष्ट्र विधिमंडळात लोकसभेचे महासचिव डॉ. अनुप मिश्रा निवडणूक निर्णय अधिकारी होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे सहाय्यक निवडणूक अधिकारी होते. महाराष्ट्र विधानसभेतील 288 पैकी 287 सदस्यांनी मतदान केले. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र, नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर परदेशात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मुंबईत एकाही खासदाराने मतदान केले नाही. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचनाही नव्हती.

देशभरात एकूण मतदान केंद्रे= 32

निवडणूक निरीक्षक= 33

मतदानाचे गणित :

खासदार= 776 आमदार= 4120

एका मताचे मूल्य= 708 एकूण मते= 10,98,903

जिंकण्यासाठी आवश्यक= 5,49,452

खासदारांची मते= 5,49,408 आमदारांची मते= 5,49,495

रामनाथ कोविंद= 63%
एनडीए= 48%
सहयोगी पक्ष= 15%

मीरा कुमार= 34%
काँग्रेस= 15%
सहयोगी (18 पक्ष)= 19%

राज्यातील गणित
122 (भाजप) + 63 (शिवसेना) + 06 (अपक्ष)

42 (काँग्रेस) + 41 (राष्ट्रवादी) + 03 (पीडब्लूपी) + 02 (कम्युनिस्ट, समाजवादी) + 02 (एमआयएम)

भुजबळ, कदम यांचे मतदान
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचेच आमदार रमेश कदम यांनी न्यायालयाच्या परवानगीने तुरूंगातून तासाभराची सुट्टी घेऊन मतदान केले. याआधी पप्पू कलानी व हितेंद्र ठाकूर यांनी तुरूंगात असताना मतदान केले होते. भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. त्यांना पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आले. त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या स्वागताला विधानसभेत उपस्थित होते. मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आले.

भुजबळ यांचा जयघोष
मतदान झाल्यानंतर भुजबळ जेव्हा विधीमंडळाच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचा जयघोष केला. सरकारने भुजबळ यांच्यावर अन्याय केला असल्याची भावनाही त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली. भुजबळ गेले वर्षभर तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात अद्याप आरोपपत्र दाखल केले नाही. भुजबळ यांच्या विरोधात हे षढयंत्र असल्याचा आरोपही त्यांच्या समर्थकांनी केला.

भुजबळांबाबत वाईट वाटतेय
रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आलेल्या भुजबळ साहेबांची अवस्था पाहून डोळ्यात अश्रू आले. त्यांच्याकडे बघून राजकारणात रहावे की नाही, असा विचारही मनात आला, अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

थकलेले भुजबळ
पांढरा कुर्ता आणि पायजमा, वाढलेली पांढरीशुभ्र दाढी, पिकलेले केस, डोळ्यावर काळी फ्रेम असलेला चष्मा, अंगावर पांघरलेली शाल या अवतारातील छगन भुजबळ यांचे शरीर थकलेले होते; खालावलेल्या प्रकृतीचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. ते साधारणतः 11.45 वाजता विधिमंडळ परिसरात पोहोचले. फ्रोझन शोल्डरचा त्रास असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यांना आधाराशिवाय चालणे शक्य नसल्याने त्यांचे पुत्र, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांनी आधार दिला होता. शरद पवार साहेबांना साथ देत पक्षासाठी काम करण्याची वेळ असताना इथे अडकून पडलोय, असे भुजबळ यांनी म्हटल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी सांगितले. मतदानावेळी पवार आणि भुजबळ यांच्यात संवाद झाला. तुम्ही सगळेजण जे काही करताय ते माध्यमांतून पाहून बरे वाटतेय, मात्र प्रत्यक्षात काम करण्याची इच्छा असतानाही करू शकत नाही, अशी खंत भुजबळांनी पवारांजवळ व्यक्त केली. न्यायालयाने भुजबळांना प्रसिध्दीमाध्यमांशी बोलण्यास परवानगी दिलेली नसल्याने त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांजवळ भावनांना वाट करुन दिली. ते बराच वेळ विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्या दालनात बसून होते. यादरम्यान त्यांनी काही राष्ट्रवादी आमदार व नेत्यांच्या भेटी घेतल्या.

ज्या कंपन्यांमधे माझी भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे ते चुकीचे आहे. मला कॅन्सर सोडून सगळे आजार आहेत. आजारातून बरा झालो तर माझ्यावरील सगळ्या आरोपांना मी उत्तरे देईन. मी जिवंत असेपर्यत माझे निर्दोषत्व सिध्द व्हावे आणि इश्वराने मला तोपर्यत जिवंत ठेवावे.
छगन भुजबळ
(सहकाऱ्यांजवळ व्यक्त केलेल्या भावना)

डॅशिंग कदम
पोलीस व्हॅनमधून आलेले रमेश कदम यांनी डॅशिंग एन्ट्री घेत सर्वांनाच चकित केले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चातापभाव किंवा अपराधीपणाची जाणीव झळकत नव्हती.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 5 ऑगस्टला मतमोजणी त्याच दिवशी

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होईल. अर्ज भरण्याच्या मंगळवारी, 18 जुलै रोजी शेवटचा दिवस आहे. यासाठी ‘एनडीए’कडून उमेदवारीसाठी व्यंकय्या नायडू, द्रौपदी मुरमू आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव या तिघांची नावे चर्चेत होती. त्यापैकी व्यंकय्या नायडू यांना सर्वाधिक पसंती असल्याने त्यांचेच नाव अंतिमत: निश्चित केले गेल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पक्षाच्या संसदीय समिती मंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत दहा ऑगस्ट रोजी संपत आहे.

हा गांधी नाही चालणार
गोपाळकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अशी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदावर कशाला हवी? आडनाव गांधी असल्याने त्यांना समर्थन देता येणार नाही. अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्यांचे मानसिक संतुलन तपासावे. संकुचित दृष्टीकोनाची व्याख्या काय आहे हे ते सोनिया गांधींनी सांगावे. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चिंता करु नये. रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित आहे.
संजय राऊत, शिवसेना नेता

Web Title- presidential election result on thursday