मोदी पंतप्रधान असल्याचा फायदा पाकिस्तानला

0

नवी दिल्ली-नरेंद्र मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी राहावे, असे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयला वाटते. मोदींची प्रतिमा कट्टरतावादी असून त्यामुळे भारतात कायम अशांतता असेल आणि याचा फायदा शेवटी पाकिस्तानलाच होईल, अशी आयएसआयची भूमिका आहे. आयएसआयचे माजी महासंचालक असद दुर्रानी यांनी हा दावा केला आहे.

असद दुर्रानी यांनी भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी प्रमुख ए. एस दुलत यांच्यासोबत एका पुस्तकाचे लिखाण केले आहे. ‘द स्पाय क्रॉनिकल’ असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकात त्यांनी भारत- पाक संबंध, दोन्ही देशांमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल, लादेनसाठी पाकमध्ये अमेरिकेने राबवलेली मोहीम अशा विविध घटनांवर भाष्य केले. दोन्ही देशांमधील गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनातून हे पुस्तक लिहीण्यात आले आहे.

कठोर निर्णय घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत दुर्रानी म्हणतात, २०१४ मध्ये भारतातील निवडणुकांकडे आयएसआयचे लक्ष होते. मोदी जिंकल्यावर पाकिस्तानमध्ये आयएसआयला आनंदच झाला. मोदी भारताची प्रतिमा मलिन करतील आणि भारतातील देशांतर्गत वातावरणही बिघडेल असे आयएसआयला वाटत होते. मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यातून काय मिळाले, हे मला समजलेच नाही. या दौऱ्यामुळे फक्त संभ्रम निर्माण झाला. मोदींना बघून अनेकांना धक्काच बसला होता. मोदींपेक्षा अटलबिहारी वाजपेयी हे चांगले नेते आहेत. ते फार बोलायचे नाहीत, पण त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता, असे दुर्रानी यांनी म्हटले आहे. ‘भारतात कट्टर हिंदुत्ववादी मोदी सत्तेत आल्यावर ते कठोर निर्णय घेणार असे आयएसआयला वाटत होते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंदर्भात मोदी हे लबाड कोल्हा असून नवाझ शरीफ हे उंट आहेत. असे त्यांनी सांगितले. शरीफ हे संथ आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.

तणाव कमी करण्यासाठी उपा
दुर्रानी यांनी दोन्ही देशांमधील तणाव कसा कमी करता येईल, याबाबतही भाष्य केले. ते म्हणतात, दोन्ही देशांमधील सत्ताधाऱ्यांनी मागच्या सीटवर जाऊन बसायला हवे. त्यापेक्षा दोन्ही देशांमधील जनतेमधील संवाद वाढू द्यावा. वैचारिक देवाण-घेवाण तसेच व्यापार वाढला की संबंधही सुधारतील, असे त्यांनी म्हटले आहे.