नवी दिल्ली : अभिनेत्री प्रिती झिंटा यांचा एक्स बॉयफ्रेंड प्रसिद्ध उद्योजक नसली वाडिया यांचा पुत्र नेस वाडिया याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात धाडले जाईल.
अभिनेत्री प्रीती झिंटाचा एके काळचा बॉयफ्रेंड असलेला नेस वाडिया आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे. वाडियाला उत्तर जपानमधील होक्काइदो विमानतळावर न्यू चितोसे विमानतळावर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक करण्यात आली. त्या वेळी त्याच्याकडे २५ ग्राम कॅनाबीस रेझिन आढळले होते. नेस वाडिया २० मार्चपूर्वी जपानमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर जामीन मिळवून तो भारतात आला. आपण खासगी वापरासाठी अंमली पदार्थ जवळ बाळगल्याचे कबूल केले होते.
सन २०२० मध्ये टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे. तसेच या वर्षी रग्बी वर्ल्डकप देखील होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अंमली पदार्थविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होत आहे. नेस हा वाडिया ग्रुपचे चेअरमन नसली वाडिया यांचा पुत्र आहे. बॉम्बे डाइंग, बॉम्बे बर्मन ट्रेडिंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर या वाडिया ग्रुपच्या कंपन्या आहेत. तसेच वाडियाकडे आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकी आहे. वाडिया साम्राज्याचे एकूण बाजारमूल्य १३.१ अब्ज डॉलर्स (९१, ७०० कोटी रुपये) इतके आहे.