सातारा-साताऱ्यात राहणाऱ्या अवघ्या २६ वर्षांच्या प्रियांका मोहिते या महाराष्ट्र कन्येने नुकतेच जगातील चौथ्या क्रमांकावर उंच असणारे ल्होत्से नावाचे शिखर सर करत एक विक्रम घडवला आहे. प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियांकाने याआधी अनेक हिमालयीन मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. इतकंच नाही तर, वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे. तिने गिर्यारोहणातील शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिरिंग येथून घेतले आहे.
बंदरपूच या शिखरापासून सुरुवात करत तिचा गिर्यारोहणातील सुरु झालेला प्रवास फ्रे पीक, एवरेस्ट अशी अनेक शिखरे पार करत सुरुच आहे. यात आता ल्होत्सेची भर पडली आहे. गिर्यारोहण क्षेत्राविषयी सांगताना प्रियांका म्हणते, गिर्यारोहण हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान समजले जाते. पण मला हा समज मान्यच नाही आणि म्हणूनच महिलाही कुठेच मागे नाहीत हे सिद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानते आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न करते, असेही ती सांगते.
प्रियांका बंगळुरु येथे एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करते. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी नोकरी करत उरलेल्या वेळात ती मोहिमांचा व पर्वत चढाईचा सराव करत असते. जगातील सर्वच अष्टहजारी उंचीची शिखरं सर करण्याचा मानस असलेली प्रियांका येत्या ऑक्टोबर महिन्यात ती मनसलू किंवा मकालू यापैकी एक शिखर सर करणार आहे. प्रियांकाने महिलांना दिलेला संदेश म्हणजे, स्वतःला कधीही कमकुवत समजू नका आणि जगातील कोणतीही गोष्ट साध्य करायला कठीण नसते.