प्रा. रामकृष्ण महाराज यांना साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर

जामनेर प्रतिनिधी ।

संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील सर्व संतांचे अभंग चरित्रकार ह.भ.प. प्रा. रामकृष्ण महाराज पाटील जामनेरकर यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारा मान्यताप्राप्त परमहंस रामचंद्र कम्युनिटी संचालित पी. आर. गृप ऑफ पब्लिकेशन यांच्या वतीने राष्ट्रीय साहित्य सन्मान पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर झाला आहे. संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज, संत मुक्ताबाई, संत शंकर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व संतांचे अभंग चरित्रकार म्हणून संत साहित्य प्राध्यापक रामकृष्णा महाराज पाटील जामनेरकर हे प्रसिद्ध आहेत. ते जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत, तुकोपनिषद ब्रह्मज्ञान, जीवनदर्शन, पंढरीची वारी, विठ्ठल चिंतन, गुरुनाम चिंतन, धर्मशास्त्र विचार दर्शन इ. धार्मिक आणि अध्यात्मिक अशा ७५ हून अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. यात जवळपास १२ ई- बुक आहेत.

महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांच्या विविध समूहांमधून ते 5/8 अक्षरी, पंचाक्षरी, षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, अभंग, गवळणी, कृष्ण भक्तीच्या लावण्या, चारोळ्या, हायकू या स्वरूपात नित्यनेमाने काव्य लेखन करत आहे. आतापर्यंत त्यांच्या जवळपास ५ हजारांहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. या साहित्यिक सारस्वतांच्या समूहातून त्यांना आतापर्यंत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे, लक्षवेधी, भावस्पर्शी, उत्तेजनार्थ अशा प्रकारचे काव्य लेखनाबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा सन्मान म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाने त्यांना केंद्रीय कमिटीचे सदस्य पद दिले आहे. संत साहित्यातील त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल पी.आर. पब्लिकेशनद्वारा राष्ट्रीय साहित्य सन्मान पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे. पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सचे चेअरमन आणि सीईओ डॉ. शंतनु रस्से यांच्या वाढदिवसाच्या दिवशी १३ मे २०२३ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रशंसा पत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार असणार आहे.