प्राध्यापक दहशतवाद्यांसोबत ठार

0

श्रीनगर – मागील आठवड्यापासून बेपत्ता असलेला काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक देखील दहशतवाद्यांसोबत ठार झाला आहे. मुहम्मद रफी भट असे प्राध्यापकाचे नाव आहे. काश्मीर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. मूळचा गंदरबाल जिल्ह्यातील चुंदुना गावातील रहिवासी असलेला प्राध्यापक भट शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होता.

शनिवारी प्राध्यापक भट याच्या शोधाची मागणी करत विद्यार्थ्यांनी काश्मीर विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन देखील केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भट याच्या आईसह पत्नी आणि भावाला बडगाम येथे आणले होते. तसेच भट याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यास सांगितले होते. मात्र, या आवाहनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बडगाम या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर देखील सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय रायफल्सचा एक जवान आणि राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा (एसओजी) एक सदस्य देखील या कारवाईत गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) आणि केंद्रीय राखीव दलाने संयुक्तरित्या कारवाई करत बडगामला घेरत दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. प्रशासनाने परिसरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत केली आहे.