शेतकऱ्यांना मिशन मोडवर पीककर्ज पुरवठा करा- मुख्यमंत्री

0

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरीपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्ज पुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन मिशन मोड मध्ये करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

तसेच पीक उत्पादन वाढीतील जलसंधारणाचे महत्व ओळखून येत्या महिन्याभरात राज्यात जलयुक्त शिवारची कामेही युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि आगामी खरीप हंगाम यशस्वी करुन दाखवावा असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परीवहन मंत्री दिवाकर रावते,आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पदुम मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, दीपक केसरकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी उत्पादकतेत जलसंधारणाचे अनन्यसाधारण महत्व ओळखून येत्याकाळात राज्याच्या ग्रामीण भागात जलयुक्त शिवार अभियानाचे काम युद्धपातळीवर करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी 30 टक्क्यांनी पर्जन्यमान कमी होऊनही गेल्या दहा वर्षातील सरासरी चांगले उत्पादन घेऊ शकलो, त्याचे कारण म्हणजे राज्यात जलसंधारणाची प्रभावीपणे झालेली कामेच आहेत. संपूर्ण मे महिन्यात जलयुक्तच्या कामांवर भर देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

खरीपासाठी दर्जेदार बियाणे साठा – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
खरीप हंगाम 2018 मध्ये 146 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. पेरणीसाठी बियाणे बदलाचे प्रमाणानुसार अन्नधान्य पिकांच्या 16 लाख 25 हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून महाबीजमार्फत 5 लाख 81 हजार क्विंटल, राष्ट्रीय बीज निगममार्फत 72 हजार क्विंटल व खासगी उत्पादकांमार्फत 10 लाख 11 हजार क्विंटल असे एकूण 16 हजार 64 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. बीटी आणि नॉन बीटी कापसाच्या 160 लाख पाकिटांची गरज असून खासगी उत्पादकांसह 167 लाख 47 हजार पाकिटे उपलब्ध आहेत. यावर्षी खरीपासाठी दर्जेदार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध केला जाईल असे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहे.

पाऊसमान चांगले
हवामान विभागानुसार एप्रिलच्या पूर्वानुमानानुसार सरासरी 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सून केरळपर्यंत कधी पोहोचेल त्याचा पूर्वानुमान 15 मे पर्यंत देता येईल त्यानंतर मॉन्सूनचे महाराष्ट्रात कधी आगमन होईल याचा अंदाज वर्तविण्यात येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण विभागात 93 ते 107 टक्के, मध्य महाराष्ट्रात 103 ते 100 टक्के, मराठवाडयात 89 ते 111 टक्के, विदर्भात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याचे श्री. श्रीवास्तव यांनी सांगितले. यावेळी चारही कृषी विद्यापिठांच्या कुलगुरू तसेच कृषी विभागाच्या सहसंचालकांनी सादरीकरण केले. कृषी विभागाने तयार केलेल्या घडी पत्रिकांचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.