शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज द्या.
काँग्रेसची मागणी; व्ही. जे. बोरसे यांना निवेदन
शिंदखेडा(प्रतिनिधी)– तालुक्यातील शेतकऱ्यांना क्षमतेची वीज उपलब्ध करा अशी मागणी शिंदखेडा काँग्रेसने केली आहे. या बाबत महावितरण कंपनीचे अधिकारी व्ही. जे. बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी प. स. सभापती सुरेश देसले, विरोधीपक्ष नेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, माजी नगरसेवक दीपक आहिरे, कैलास वाघ, हाजी शब्बीर पठाण, प्रमोद पवार, सताळीस पाटील आदी उपस्थित होते. निवेदनाचा आशय असा : तालुक्यातील शेतकरी महाराष्ट्र वीज मंडळाचा कारभारावर तीव्र संतापलेली आहे. राज्यातील सरकारच्या ऊर्जाखात्याच्या भोंगळ कारभार व अकार्यक्षमतेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असताना नियोजनाच्या अभावामुळे फक्त तास दोन तास वीज उपलब्ध होत आहे. इतके भ्रष्ट अधिकारी शिंदखेडा तालुक्यात असल्यामुळेच वीज विभागाचा हा नाकर्तेपणा जनतेसमोर येत आहे. स्थानिक लोक प्रतिनिधी व ऊर्जा मंत्री या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करतील असा नागरिकांना प्रश्न आहे. वीस वर्षात या तालुक्यात १३२ के. व्ही. चे सबस्टेशन स्थानिक आमदार उभारू शकले नाही. हे त्यामुळेच तालुक्यातील विजेचे नियोजन होत नाही अशी खंत शेतकऱ्यांच्या मनात आहे. यंदा लागवडीचे क्षेत्र वीज मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळे संकटात सापडलेले आहे. शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान याची जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची आहे. शिंदखेडा तालुक्यातील वीजेचा लपंडाव तत्काळ सुरळीत न झाल्यास ऊर्जामंत्र्याचा राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या सोमवारी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.