सांगवीच्या फेमस चौकातील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रकारण
पिंपरी-चिंचवड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव फॉर्च्यूनर मोटार हॉटेलमध्ये घुसून वृद्ध हॉटेलमालक ठार झाले, तर चारजण जखमी झाले. जखमीत हॉटेल मालकाच्या पत्नी, एक ग्राहक व मोटारचालकाचा समावेश आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सांगवीतील फेमस चौकात ही थरारक घटना घडली. अपघात सीसीटीव्ही कॅमेर्यात टिपला गेला आहे. सोशल मिडियामुळे मिनिटभरात ही बातमी शहरभर झाले. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
मृतात हॉटेलमालक, तर जखमीत पत्नी, वेटरचा समावेश
निखील पुरोहित यांच्या मालकीची ही मोटार (एमएच 12 केजे 0333) असून सचिन जाधव (वय 40, रा. नवी सांगवी) ती चालवित होता. कॅमेर्यात टिपल्या गेलेल्या दृश्यानुसार दुपारी एक वाजता अति वेगात मोटार फेमस चौकात आली आणि वळण्याऐवजी समोर असलेल्या अनंत भोजनालयमध्ये घुसली. यावेळी तिथे असलेले मालक ओमप्रकाश अंबादास पंदिनवार (वय 60, रा. नवी सांगवी) यांचा धडक बसून जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी सुवर्णा (वय 55) व वेटर बसवराज (50) हे गंभीर जखमी झाले. मोटार चालक जाधव यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
मोठा अनर्थ टळला
धडक इतकी जोरदार होती की मोटार दोन पायर्यांवर असलेल्या या हॉटेलमध्ये चढली. यामुळे हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली असून इमारतीचेही नुकसान झाले आहे. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ व हॉटेलमध्ये ग्राहकही कोणी नव्हते यामुळे मोठा अनर्थ टळला.