पुणे : लोहगाव विमानतळावरून पुणे ते नागपूर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगमध्ये त्याच्या नकळत एक काडय़ापेटी राहिली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ही बाब त्याच्या लक्षात आली. पण, त्याच्याकडील ही काडय़ापेटी सुरक्षा यंत्रणेच्या नजरेतून सुटली. संबंधित प्रवाशानेच समाज माध्यमातून ही बाब समोर आणली. त्यामुळे संवेदशील समजल्या जाणाऱ्या लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बॅगेत होती काडीपेटी
विमान प्रवासामध्ये कोणत्याही प्रवाशाला ज्वलनशील वस्तू बरोबर नेता येत नाही. काडय़ापेटीही त्यात मोडते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवाशाची तपासणी करताना किंवा स्कॅनरद्वारे बॅग तपासताना अशा वस्तू सुरक्षा यंत्रणांकडून काढून घेतल्या जातात.
गुरुवारी लोहगाव विमानतळावरून नागपूरला जाणाऱ्या एका प्रवाशाने त्याच्याकडील काडय़ापेटीचा किस्सा समाज माध्यमावर कथन केला आहे. प्रवाशाच्या म्हणण्यानुसार त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेमध्ये चुकून एक काडय़ापेटी राहिली होती. विमानाने उड्डाण केल्यानंतर ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यानंतर लगेचच त्याने ही काडेपेटी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे सुपूर्त केली आणि त्याबाबत माफीही मागितली.