एटीएममध्ये ठणठणाट!

0

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात चलन तुटवडा
बहुतांश एटीएम सेंटरवर ‘नो कॅश’चे बोर्ड झळकले

पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम सेंटरमधील रोकड संपली असून, दोन्हीही शहरात चलन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पैशासाठी वणवण भटकंती सुरु आहे. गेल्या पंधरवडाभरापासून हा प्रकार सुरु असून, चलन तुटवडा निर्माण होण्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. बँकांशी संपर्क साधला असता, दोन हजार व 500च्या नोटांचा पुरवठा अचानक कमी झाला असून, 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा होत आहे. या नोटा लवकर संपत असल्याचे सांगण्यात आले. जास्तीत जास्त रोख रकमेची मागणी नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

शहरवासीयांची पैशासाठी भटकंती
पैसे काढण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडकर विविध एटीएमवर भटकंती करताना दिसत असून, त्यांना प्रत्येक ठिकाणी नो कॅशच्या बोर्डला सामोरे जावे लागत आहे. वाकड येथील ज्येष्ठ नागरिक रमेश जगताप यांनी सांगितले, की शुक्रवारी व शनिवारी आपण तब्बल दहा एटीएमवर फिरलो. तरीदेखील मला पैसे मिळू शकले नाहीत. शेवटी रविवारी सकाळी पिंपरीत दोनशेच्या नोटांच्या स्वरुपात चार हजार रुपये काढता आले. आरबीआयकडून बँकांना होणारा रोकड पुरवठा अचानक कमी झाला असून, त्यातही दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे नागरिकांची पैशाची मागणी पूर्ण करताना दोनशे व पाचशेच्या नोटा कमी पडत आहेत, अशी माहिती एचडीएफशी बँकेच्या व्यवस्थापकाने दिली. पैशाची चणचण पाहाता, ग्राहकांनी एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय या बँकांच्या ट्वीटरवरदेखील सूचना पोस्ट केल्या आहेत. तरीही बहुतांश बँकांचे एटीएम कोरडे ठणठण असल्याबद्दल शहरवासीयांत संताप व्यक्त होत आहे.

बँकांची रोकड संपली!
पिंपरी-चिंचवड व पुणेकरांची दररोजच्या पैशाची मागणी मोठी आहे. परंतु, बँकांकडे एटीएममध्ये भरण्यासाठी रोकड नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिंपळे सौदागर, वाकडसह पुण्यातील अनेक भागात एटीएमबाहेर मोठ्या प्रमाणात रांगाही दिसून येत आहेत. कॉसमोस को. ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले, की बहुतांश बँका या पैशासाठी अन्य बँकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे रोकड उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत. आमच्याकडे स्वतःची करन्सी चेस्ट असल्यामुळे आम्हाला मात्र अशी समस्या नाही, असेही त्यांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएमदेखील कोरडे पडल्याने पुणेकरांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पुण्यात फेरी मारली असता, एसपी कॉलेजजवळील कॅनरा बँकेचे एटीएम, सदाशिव पेठेतील सिंडिकेट, एसबीआय, बँकेचे एटीएम कोरडे होते. बहुतांश बँकांनी नो कॅशचे फलक दरवाज्यावर चिकटवलेले होते.