पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातांना चाप लावण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अतिवेगाने चालवणाऱ्या गाड्या टिपण्यासाठी स्पीड गन कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. जादा स्पीडिंग आणि लेन कटिंगमुळे एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या वारंवार घटना घडत असतात. याची गंभीर दखल घेऊन अपघात होऊ नयेत म्हणून पोलिसांनी मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे.
180 प्रतिकिलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त स्पीडने गाडय़ा चालवल्या जातात एक्स्प्रेस वेवर गाडी गेली की चालक अक्षरशः वेगाशी स्पर्धा करतात. परिणामी अनेकदा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होतो, तर बऱ्याच वेळा अतिवेगात असताना गाडीचे टायर फुटून दुर्घटना घडते. अतिवेगाबरोबरच लेन कटिंगचीदेखील समस्या आहे. लेन कटिंगमुळेदेखील अपघात घडतात. अशा अपघातांमध्ये नियमांचं पालन करून जाणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन महामार्ग पोलिसांनी एक्स्प्रेस वेवर स्पीड गन इन ऍक्शन केले आहेत. आजपासून पोलिसांनी कॅमेऱ्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. हे कॅमेरे अतिवेगात जाणाऱ्या आणि लेनची शिस्त न पाळणाऱ्या गाडय़ांवर वॉच ठेवणार आहेत.