पुणे : पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्न केली आहेत. मात्र या लग्नांबाबत तिनही पत्नींना कानोकानी खबर देखील नव्हती, या महाभागाने प्रत्येक पत्नीला आपले केवळ तुझ्याच सोबत लग्न झाले आहे हे पटवून दिले होते असे आरोप दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीने केले आहे.
तिन्ही पत्नींना कानोकानी खबर नाही
शिपाई विजय जाधव (वय-३८) याचा पहिल्या पत्नीसोबत बारामती कोर्टात गेले तीन वर्षांपासून खटला सुरू आहे. त्याने २४ डिसेंबर २०१६ ला अन्य एका महिलेसोबत गुपचूप विवाह केला. महिलेने दावा केला आहे की, त्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी पहिल्या लग्नाची ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. तसेच, पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोटही झाला नाही.
लग्नासाठी घेतला हुंडा
पहिली बायोक माहेरी जाताच दुसऱ्या बायकोसाठी शोधाशोध करायचा, दुसरी बायको माहेरी जाताच विजय जाधवने थेट तिसऱ्या बायकोसाठी स्थळ शोधणे सुरू केले. १२ डिसेंबर २०१७ मध्ये त्याने तिसरे लग्न केले. विशेष म्हणजे त्याने तिसऱ्या बायकोपासूनही पहिली दोन लग्नं झाल्याची माहिती लपवून ठेवली. महिलेने आरोप केला आहे की, त्याने तीसऱ्या लग्नातही मुलींकडच्या मंडळीकडून ५० हजार रूपये हुंडा म्हणून घेतले आहेत.
गुन्हा दाखल
दरम्यान, विजयच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत कळले तेव्हा तिने लोनीखंड पोलीस टाण्यात ११ एप्रिल २०१८मध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विजय आणि त्याचे वडील लक्ष्मण तसेच, त्याच्या भावांविरोधातही भा.दं.सं.च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस दलातील वरिष्ठांना जेव्हा विजयने तीन लग्नं करून फसवणूक केल्याबाबत तक्रार दाखल झाल्याची माहिती समजली तेव्हा त्याला थेट निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने विजयचे कृत्य अत्यंत गंभीर असल्याच्या कारणावरून त्याचे निलंबन केल्याचे समजते.