पुण्याच्या निकाल सांगतो, लोकांना बदल हवाय
राजकारण : पुणे पोटनिवडणुक निकालावर शरद पवारांनी केले भाष्य, येणार्या निवडणुकीत दिसेल परिणाम
बारामती |प्रतिनिधी
भाजपला कसब्यात केवळ दोन ठिकाणी अधिक मतं मिळाली. नाही तर कसब्यात सरसकट मतं रवींद्र धंगेकरांना मिळाली आहेत. हा एक बदल आहे. आणि हा बदल पुण्यात होतोय. याचा अर्थ नागरिकांना बदल हवा आहे, यातून हे स्पष्ट होऊ लागलं आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल’, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांना हात घातला. ‘नागालँडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी हा दोन नंबरचा पक्ष झाला असून येथील जनतेने दाखवलेल्या विश्वासाने हे करणं शक्य झालं आहे. स्थानिक नेत्यांनी चांगली मेहनत घेतली. मतांची चांगली टक्केवरी पाहायला मिळत आहे. उमेदवारांना चांगली मतं मिळाली’, असं शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरला आहे. सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती येईल आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ’, असं सांगत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले.
बदलाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकही जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं आहे. निवडणुकीत सत्तेच्या वापर दिसून आला. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणं योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचं चित्र बदलत आहे’, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
निवडणूक आयुक्त नियुक्तीबाबत चांगला निर्णय
सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला गेला. त्याच्यामध्ये आयुक्तांची नियुक्ती करताना सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही यामध्ये यावा. या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले आणि हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे’, असं शरद पवार म्हणाले.
हे देखील वाचा